नवेगाव वन्यजीव अभयारण्य
महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात वसलेले नवेगाव वन्यजीव अभयारण्य हे निसर्गप्रेमी आणि वन्यजीव प्रेमींसाठी नंदनवन आहे. १८ व्या शतकापासून अस्तित्वात असलेले हे अभयारण्य समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखले जाते आणि आज एक प्रमुख इको-टुरिझम केंद्र म्हणून विकसित झाले आहे. हिरव्यागर्द जंगलांचे सौंदर्य, नीरव शांतता आणि अनोख्या वन्यजीव प्रजाती यामुळे नवेगाव अभयारण्य पर्यटकांना अपूर्व अनुभव देते. तुम्हाला साहस हवे असेल, शांतता शोधत असाल किंNavegaon Wildlife Sanctuaryवा निसर्गाशी आत्मीयता वाढवायची असेल, तर नवेगाव अभयारण्य तुमच्यासाठी नक्कीच अविस्मरणीय ठरेल.
भौगोलिक वैशिष्ट्ये
१३३.७८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेले नवेगाव वन्यजीव अभयारण्य घनदाट जंगले, टेकड्या आणि शांत जलाशयांचे अद्भुत मिश्रण आहे. या अभयारण्याच्या मध्यभागी वसलेले नवेगाव सरोवर, सुमारे ११ चौरस किलोमीटर विस्तारलेले असून १८ व्या शतकात कोळी पाटील यांनी बांधल्याचे मानले जाते. हे रमणीय सरोवर संपूर्ण परिसराला मंत्रमुग्ध स्वरूप देते. अभयारण्याचा भूभाग अत्यंत विविधतापूर्ण आहे. समुद्रसपाटीपासून ३० ते ७०० मीटर उंचीपर्यंत पसरलेल्या टेकड्या येथे दिसून येतात. ही भौगोलिक समृद्धता जैवविविधतेसाठी अनुकूल ठरते आणि असंख्य वनस्पती तसेच वन्यजीवांना समृद्ध अधिवास उपलब्ध करून देते.
- वनस्पती (फ्लोरा)
नवेगाव वन्यजीव अभयारण्य प्रामुख्याने दक्षिण उष्णकटिबंधीय कोरड्या पानगळी जंगलांनी व्यापलेले आहे. ज्यामध्ये आर्द्रतेने समृद्ध असलेल्या हिरव्यागार वनस्पतींचा समावेश आहे. येथे आढळणाऱ्या प्रमुख वृक्षांमध्ये सागवान, हळदू, जांभूळ, कवठ, मोह, आइन, भेल आणि भोर यांचा समावेश होतो. ही घनदाट आणि विविध प्रकारची वनस्पतीसंपदा केवळ परिसराच्या सौंदर्यात भर घालत नाही तर अनेक वन्यप्राण्यांसाठी महत्त्वाचा अधिवास देखील निर्माण करते. त्यामुळेच नवेगाव अभयारण्य हे वनस्पतीशास्त्रज्ञ आणि निसर्गप्रेमींसाठी एक खजिनाच ठरते. - वन्यजीव (फॉना)
नवेगाव वन्यजीव अभयारण्य विविध प्राण्यांसाठी समृद्ध अधिवास आहे. येथे भक्षक आणि शाकाहारी प्राण्यांचे मनमोहक दर्शन घडते, ज्यामुळे निसर्गप्रेमींना आणि वन्यजीव अभ्यासकांना अनोखा अनुभव मिळतो. - प्राणी
अभयारण्यात वाघ, बिबट्या,रान मांजर, लहान भारतीय कस्तुरी मांजर(सिव्हेट), ताड कस्तुरी मांजर, लांडगे, कोल्हे, सांबर, गवा (बायसन), नीलगाय, रानडुक्कर, चितळ आणि अस्वल यांसारखे विविध प्राणी आढळतात. हे सर्व प्राणी अभयारण्याच्या परिसंस्थेचे (इको सिस्टिमचे) संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांचा नैसर्गिक अधिवासात मुक्त संचार पाहणे ही निसर्गप्रेमींसाठी एक अविस्मरणीय अनुभूती ठरते. - पक्षी
नवेगाव अभयारण्यात असलेले डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य हे पक्षीप्रेमींसाठी नंदनवनच आहे. येथे सुमारे २९० हून अधिक पक्षी प्रजाती आढळतात. ज्या महाराष्ट्रातील सुमारे ६०% पक्षीवैविध्याचे प्रतिनिधित्व करतात. हिवाळ्यात तर हे अभयारण्य आणखीनच देखणे भासते, कारण विविध स्थलांतरित बदके आणि करकोचे नवेगाव तलावावर येतात. त्यांचे मोठ्या संख्येने येणे आणि त्यांचा विहार पाहणे हा एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव असतो. - सरपटणारे आणि उभयचर जीव
नवेगाव अभयारण्यात केवळ पक्षी आणि सस्तन प्राणीच नाहीत, तर विविध सरपटणारे आणि उभयचर प्राणीही येथे आढळतात. यामुळे येथील परिसंस्था अधिक संपन्न आणि संतुलित राहते. अजगर, सरडे, नाग, पाणसाप आणि बेडूक यांसारख्या जीवसृष्टीचा येथे सहज प्रत्यय येतो. यामुळे जैवविविधतेच्या दृष्टीने हे अभयारण्य अत्यंत महत्त्वाचे स्थान मानले जाते.
संवर्धनाचे प्रयत्न
नवेगाव अभयारण्य वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरणीय समतोल राखण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. हे अभयारण्य अनेक दुर्मिळ आणि संकटग्रस्त प्रजातींना सुरक्षित आश्रय प्रदान करते, तसेच स्थानिक इको सिस्टिमच्या संवर्धनासाठी योगदान देते.
येथील वन विभाग आणि अभयारण्य प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे. जसे की –
- नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण – जंगलतोड रोखणे, वृक्षारोपण आणि जैवविविधता टिकवणे.
- शिकारविरोधी मोहिमा – गस्त पथकांद्वारे गस्त वाढवून शिकारीला आळा घालणे.
- स्थानिक समुदायांचा सहभाग – पर्यावरण शिक्षण, रोजगाराच्या संधी आणि इको-टुरिझमच्या माध्यमातून ग्रामस्थांना जोडणे.
हे प्रयत्न मानव आणि वन्यजीव यांच्यातील समतोल राखण्यास मदत करतात, तसेच भावी पिढ्यांसाठी निसर्गाचे संरक्षण सुनिश्चित करतात.
ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज
नवेगाव अभयारण्याला भेट देणे म्हणजे केवळ जंगलात फेरफटका मारणे नव्हे, तर एक रोमांचक साहस अनुभवणे आहे. येथे जंगल सफारीसाठी उत्तम सुविधा आहेत. दाट जंगलातून जाणारा हा प्रवास थरारक वाटतो. वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याची संधी येथे मिळते.
पक्षीप्रेमींना अभयारण्याच्या वॉचटॉवरवरून निसर्गाचे अद्भुत दर्शन घेता येते. स्थलांतरित पक्ष्यांच्या हंगामात येथे विविध रंगीबेरंगी पक्ष्यांचे आगमन होते. नवेगाव तलावात बोटिंग करताना शांत पाण्यात तरंगत निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याचा आनंद लुटता येतो. वनातील नेचर ट्रेल्सवर चालताना येथील समृद्ध वनस्पती आणि प्राणिजगत जवळून पाहता येते. अधिक सखोल माहिती हवी असल्यास अभयारण्यातील व्याख्या केंद्र आणि संग्रहालय पर्यटकांसाठी माहितीपूर्ण अनुभव देतात.
साहस, विश्रांती आणि ज्ञान यांच्या अनोख्या संगमाचा अनुभव घ्यायचा असेल, तर नवेगाव अभयारण्य निसर्गप्रेमींसाठी एक अद्वितीय ठिकाण आहे.
भेट देण्यासाठीचा उत्तम काळ
नवेगाव अभयारण्य वर्षभर खुले असले तरी ऑक्टोबर ते जून हा भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. या काळात हवामान आल्हाददायक असल्यामुळे जंगल सफारीचा अनुभव अधिक आनंददायक होतो. यावेळी वन्यजीव सहजपणे दिसण्याची शक्यता जास्त असते. जंगलात सफर करताना वाघ, हरणे, अस्वल आणि निलगाय यांसारखे प्राणी पाहता येतात.
पक्षीप्रेमींसाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ विशेष आकर्षक आहे. या महिन्यांत स्थलांतरित पक्ष्यांचे मोठ्या संख्येने आगमन होते. नवेगाव तलावाच्या किनारी बगळे, करकोचे, बदके आणि विविध जलपक्षी पाहायला मिळतात. रंगीबेरंगी पक्ष्यांचे थवे, त्यांचे मनमोहक आवाज आणि त्यांची हालचाल पाहणे हा एक अद्भुत अनुभव असतो.
हिवाळ्यात अभयारण्याची हिरवाई अधिक खुलते. थंड हवामानामुळे जंगलातील फिरणे अधिक सुखद वाटते. निसर्गप्रेमींसाठी आणि छायाचित्रकारांसाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो. जैवविविधतेचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल, तर हिवाळ्यात नवेगाव अभयारण्याला भेट देणे हा सर्वोत्तम पर्याय ठरतो.
नवेगावला कसे पोहोचाल?
हे निसर्गरम्य अभयारण्य सहज पोहोचण्याजोगे आहे. हवाई, रेल्वे आणि रस्तेमार्गाने येथे सोयीस्कर प्रवास करता येतो. सर्वात जवळचे विमानतळ नागपूरमध्ये आहे. जे सुमारे १५० किलोमीटर अंतरावर आहे. तेथून टॅक्सी किंवा बसने अभयारण्यात पोहोचता येते. प्रवास आनंददायक असून हिरवीगार शेतं आणि लहान गावांमधून जातो.
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी देवळगाव हे सर्वात जवळचे स्थानक आहे. हे अभयारण्यापासून अवघ्या २ किलोमीटरवर आहे. गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमार्गावर असल्याने येथे उतरणे सोयीस्कर ठरते. स्थानकावरून रिक्षा आणि टॅक्सी सहज उपलब्ध असतात.
रस्त्याने प्रवास करताना नवेगाव राष्ट्रीय महामार्ग NH6 आणि NH353C वर असल्यामुळे प्रवास सुलभ होतो. नागपूर आणि गोंदियाहून येथे नियमित बससेवा सुरू आहे. रस्त्याने प्रवास करताना निसर्गाचे सुंदर दर्शन होते. पक्षी आणि छोटे वन्यजीवही अधूनमधून दिसतात.
निवास व्यवस्था
नवेगाव वन्यजीव अभयारण्यात राहण्याची उत्तम व्यवस्था महाराष्ट्र वनविकास महामंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात आरामदायी वास्तव्य करण्यासाठी येथे विविध निवास पर्याय आहेत. काही कॉटेज नवेगाव तलावाच्या सुंदर परिसरात असून, येथे राहण्याचा अनुभव अत्यंत प्रसन्न आणि शांततेचा असतो. येथे राहून सकाळच्या गार वाऱ्यात पक्ष्यांचे किलबिल ऐकत निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद लुटता येतो. अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळ हॉलिडे होम्सही उपलब्ध आहेत.जी कुटुंब आणि मित्रमंडळींसोबत येण्यासाठी आदर्श निवासस्थाने आहेत. सोयीस्कर लोकेशन, प्रशस्त खोल्या आणि आवश्यक सुविधा यामुळे या निवासांचे पर्यटकांमध्ये विशेष आकर्षण आहे. बजेटमध्ये प्रवास करणाऱ्या तरुण पर्यटकांसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी युथ हॉस्टेल हा उत्तम पर्याय आहे. वन्यजीव निरीक्षण करणाऱ्या आणि जंगल सफारीचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी हे निवासस्थान उपयुक्त ठरते. पर्यटन हंगामात विशेषतः ऑक्टोबर ते मे या कालावधीत अभयारण्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते. यासाठी आगाऊ बुकिंग करणे अत्यंत आवश्यक आहे.
जवळची पर्यटनस्थळे
नवेगाव वन्यजीव अभयारण्याला भेट दिल्यानंतर त्याच्या आसपासच्या अद्भुत पर्यटन स्थळांना भेट देऊन तुम्ही तुमचा प्रवास अधिक रोमांचक आणि संस्मरणीय बनवू शकता.
केवळ ६० किमी अंतरावर असलेले नागझिरा अभयारण्य हे वन्यजीव प्रेमींसाठी एक अनोखा अनुभव देणारे ठिकाण आहे. येथे वाघ, बिबटे, अस्वल आणि असंख्य पक्षी पाहायला मिळतात, त्यामुळे निसर्गप्रेमींनी येथे अवश्य भेट द्यावी. जर तुम्हाला शांतता आणि मनमोहक दृश्यांचा अनुभव घ्यायचा असेल तर इटियाडोह धरण (२० किमी) तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. येथे तुम्ही बोटिंगचाही आनंद घेऊ शकता. कचारगड लेण्या (५५ किमी) तब्बल २५,००० वर्षे जुना वारसा जपणाऱ्या आहेत आणि साहसप्रिय पर्यटकांसाठी पर्वणी ठरतात. श्रद्धाळू भक्तांसाठी अर्जुनी येथील देवी मंदिर (३० किमी) हे पवित्र ठिकाण आहे. आई दुर्गेला समर्पित हे मंदिर संपूर्ण वर्षभर भाविकांनी गजबजलेले असते.
पर्यटकांसाठी महत्वाची माहिती
नवेगाव वन्यजीव अभयारण्यात सर्वोत्तम आनंद घेण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स पाळणे गरजेचे आहे. सर्वप्रथम, मार्गदर्शित सफारीचा पर्याय निवडा, कारण अनुभवी गाईड्स तुम्हाला अभयारण्यातील समृद्ध जैवविविधतेची माहिती देतात आणि तुमचा अनुभव अधिक ज्ञानवर्धक बनवतात. जंगलात फिरताना सुरक्षितता नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वन्यजीवांपासून सुरक्षित अंतर राखा, मोठ्या आवाजाने गोंधळ घालू नका आणि अभयारण्याच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा. हे केवळ तुमच्या सुरक्षिततेसाठीच नाही, तर येथील प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाच्या संरक्षणासाठी देखील महत्त्वाचे आहे. शिवाय, पर्यावरणपूरक सवयी अंगीकारा. पुन्हा वापरता येण्याजोग्या पाण्याच्या बाटल्या बाळगा, कचरा टाकणे टाळा आणि प्लास्टिकचा कमीत कमी वापर करा. यामुळे नवेगाव अभयारण्याचे नैसर्गिक सौंदर्य कायम राहील आणि पुढील पिढ्यांनाही हे वनवैभव अनुभवता येईल.
नवेगाव अभयारण्याला का भेट द्यावी?
तुम्ही साहसप्रेमी असाल, वन्यजीव निरीक्षक असाल किंवा निसर्गाच्या सान्निध्यात शांतता शोधत असाल, नवेगाव वन्यजीव अभयारण्य तुम्हाला अद्वितीय अनुभव देईल. रोमांचक जंगल सफारींपासून शांत तलावातील बोटिंग आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या पक्षी निरीक्षणाच्या संधींपर्यंत, येथे प्रत्येक निसर्गप्रेमीसाठी काहीतरी खास आहे. हे अभयारण्य महाराष्ट्राच्या नैसर्गिक संपत्तीतील एक अनमोल ठेवा आहे, ज्याची जादू अनुभवण्यासाठी तुम्ही नक्कीच भेट द्यावी.
Travel Essentials
Here are the travel essentials one should know
Top Attractions
Discover the beauty and culture of Maharashtra through our curated experiences