नागझिरा वन्यजीव अभयारण्य

महाराष्ट्राच्या घनदाट जंगलामध्ये वसलेले नागझिरा वन्यजीव अभयारण्य निसर्गप्रेमी आणि वन्यजीव निरीक्षकांसाठी एक अद्वितीय ठिकाण आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये विस्तारलेले हे अभयारण्य पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. निसर्ग दृष्यांनी मोहून टाकणारे जंगल, समृद्ध जैवविविधता आणि वन्यजीव यामुळे नागझिरा हे साहस आणि निसर्गाच्या सहवासाचा आस्वाद घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी अविस्मरणीय अनुभव ठरते.

भौगोलिक वैशिष्ट्ये

सुमारे १५२.८१ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेले नागझिरा वन्यजीव अभयारण्य निसर्गाच्या अद्वितीय सौंदर्याने नटलेले आहे. सौम्य उताराच्या टेकड्या, खोल दऱ्या आणि नितळ पाण्याच्या प्रवाहांनी युक्त अश्या या अभयारण्याच्या मध्यभागी प्राचीन ‘नाग’ मंदिर आहे. ‘झिरा’ या मराठी शब्दाचा अर्थ ‘शाश्वत जलस्रोत’. यावरून या ठिकाणाला ‘नागझिरा’ हे नाव मिळाले आहे. घनदाट जंगलापासून मोकळ्या कुरणांपर्यंत विविध प्रकारच्या नैसर्गिक वातावरणाचा समावेश असलेले हे अभयारण्य असंख्य वनस्पती आणि प्राण्यांचे आश्रयस्थान आहे.

  • वनस्पती (फ्लोरा)
    नागझिरा अभयारण्यातील जंगल दक्षिणी उष्णकटिबंधीय कोरडे पानगळी जंगल या प्रकारात मोडते आणि विविध प्रकारच्या वनस्पतींसह निसर्गाचा अद्वितीय संगम प्रस्तुत करते. येथील जंगलात सागवान (Tectona grandis) हे सर्वाधिक आढळणारे झाड असून त्यासोबत ऐन (Terminalia tomentosa), हळदू (Adina cordifolia), धाओरा (Anogeissus latifolia) आणि बांबू (Dendrocalamus strictus) यांची विपुलता आहे. जमिनीवर गवत, औषधी वनस्पती आणि हंगामी फुलांनी नटलेले गालिचे या जंगलाच्या रांगड्या सौंदर्यात भर टाकतात.
  • वन्यजीव (फॉना)
    नागझिरा अभयारण्य हे भारतातील काही महत्वाच्या वन्यजीव प्रजातींसाठी सुरक्षित आश्रयस्थान आहे.
  • सस्तन प्राणी
    नागझिराच्या घनदाट जंगलात बंगाल वाघ, भारतीय बिबट्या, अस्वल, गौर, सांबर, नीलगाय, चितळ, चौशिंगी आणि रानडुक्कर यांसारखे काही शिकारी तर काही शाकाहारी प्राणी मोठ्या संख्येने आढळतात. दुर्मिळ भारतीय खवल्या मांजर जे आपल्या सुरक्षेसाठी संरक्षित जंगलांचा आसरा घेते, ते सुद्धा येथे आढळते.
  • पक्षी
    सुमारे १६६ हून अधिक पक्षी प्रजाती येथे आढळतात. त्यामुळे हे ठिकाण पक्षीप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. रंगीबेरंगी भारतीय मोर, ताकदवान गरुड (Accipitridae) कुटुंबातील शिकारी पक्षी, तसेच बार-हेडेड गूज यांसारखे हंगामी स्थलांतरित पक्षी येथे मोठ्या संख्येने पाहायला मिळतात.
  • सरपटणारे आणि उभयचर
    येथे ३६ हून अधिक सरपटणाऱ्या प्रजाती आढळतात. भारतीय अजगर, विषारी नाग, रसेल वायपर आणि मॉनिटर लीझर्ड (घोरपड) यांसारखे सरपटणारे प्राणी या जैवविविधतेला संपन्न करतात. तसेच ट्री फ्रॉग आणि बुलफ्रॉग यांसारखे उभयचर प्राणी देखील येथे आढळतात, जे जंगलाच्या परिसंस्थेला अधिक समृद्ध करतात.

संवर्धनाचे प्रयत्न

नागझिरा अभयारण्य महाराष्ट्राच्या समृद्ध जैवविविधतेच्या संरक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. हे केवळ दुर्मिळ आणि संकटग्रस्त प्रजातींचे रक्षण करणारे स्थान नसून, पर्यावरण शिक्षण, परिसंस्था (इको-सिस्टिम) पुनर्स्थापना आणि शाश्वत इको-टुरिझमसाठीही महत्त्वाचे केंद्र आहे. येथे पर्यावरण पुनर्स्थापनेसाठी वृक्षारोपण, पाणथळी क्षेत्रांचे संवर्धन आणि वनसंवर्धनाचे विविध उपक्रम राबवले जातात. शिकारींपासून वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी अत्याधुनिक कॅमेरे आणि गस्त पथकांच्या मदतीने काटेकोर उपाययोजना केल्या जातात. स्थानिक समुदायांचा सहभागही या संवर्धन प्रयत्नांमध्ये महत्त्वाचा आहे. त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, जैवविविधतेचे महत्त्व समजावणे आणि संरक्षण उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग वाढवणे यावर भर दिला जातो. या सर्व प्रयत्नांमुळे नागझिरा अभयारण्य वन्यजीव संवर्धनाचे एक आदर्श उदाहरण ठरत आहे.

ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज

निसर्गाच्या कुशीत रोमांचकारी आणि विस्मयकारक अनुभव घेण्यासाठी नागझिरा अभयारण्य हे एक अद्भूत ठिकाण आहे. येथे विविध साहसी उपक्रमांचा आनंद लुटण्याची संधी पर्यटकांना मिळते. जिप सफारीच्या माध्यमातून अभयारण्याच्या घनदाट जंगलात फिरताना वन्यजीवांचे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात निरीक्षण करता येते. अनुभवी मार्गदर्शकांच्या मदतीने दुर्मिळ प्राण्यांचे दर्शन घेण्याची संधी मिळते. पक्षी निरीक्षणासाठी नागझिरा हे स्वर्गच म्हणावे लागेल, कारण येथे स्थायिक आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या असंख्य प्रजाती पाहायला मिळतात. त्यांचे किलबिलाट आणि विलोभनीय हालचाली पक्षीप्रेमींना मंत्रमुग्ध करतात. निसर्गभ्रमंती करताना जंगलातील समृद्ध जैवविविधतेचा जवळून अनुभव घेता येतो. तसेच औषधी वनस्पती आणि दुर्मिळ वृक्षांविषयी माहिती मिळते. छायाचित्रणासाठीही हे ठिकाण स्वर्गासमान आहे, जिथे घनदाट जंगल, वन्यजीव आणि नयनरम्य दृश्ये कॅमेऱ्यात कैद करता येतात.

भेट देण्यासाठीचा उत्तम काळ

नागझिरा वन्यजीव अभयारण्य भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते जून हा सर्वोत्तम कालावधी मानला जातो. या काळात हवामान आल्हाददायक असते आणि वन्यजीव सहज दिसण्याची संधी अधिक मिळते. हिवाळ्यात (नोव्हेंबर ते फेब्रुवारी) थंडगार वातावरणात जंगल सफारी आणि पक्षीनिरीक्षणाचा आनंद लुटता येतो, तर उन्हाळ्यात (मार्च ते जून) पाणवठ्यांवर येणाऱ्या वन्यप्राण्यांचे निरीक्षण करणे अधिक सोपे होते.

जुलै ते सप्टेंबर या काळात अभयारण्य पावसाळ्यामुळे पर्यटकांसाठी बंद ठेवले जाते. या काळात जंगलातील निसर्गसृष्टी नव्याने बहरते, परिसंस्था (इको-सिस्टम) समृद्ध होते आणि वन्यजीवांना विसावा मिळतो. त्यामुळे नागझिराच्या नैसर्गिक सौंदर्याचा आणि रोमांचक सफारीचा आनंद घ्यायचा असल्यास, ऑक्टोबर ते जून या काळात येथे भेट द्यावी.

नागझिराला कसे पोहोचाल?

नागझिरा प्रवाशांसाठी हवाई, रेल्वे आणि रस्त्याने सहज पोहोचण्याजोगा आहे. जवळचे विमानतळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे आहे, जे सुमारे १२२ किमी अंतरावर आहे. विमानतळावरून नागझिरासाठी टॅक्सी आणि बस उपलब्ध असतात. नागपूरहून नागझिराकडे जाणारा रस्ता निसर्गरम्य असून प्रवास सुखद वाटतो.

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी गोंदिया आणि भंडारा रोड ही सर्वात जवळची रेल्वे स्थानके आहेत. ही दोन्ही स्थानके सुमारे ५० किमी अंतरावर आहेत आणि मोठ्या शहरांशी चांगल्या प्रकारे जोडलेली आहेत. रेल्वे स्थानकावरून नागझिरासाठी टॅक्सी किंवा स्थानिक वाहतूक उपलब्ध आहे.

राष्ट्रीय महामार्ग ५३ वर असल्याने नागझिराला रस्त्याने सहज पोहोचता येते. जवळच्या शहरांमधून नियमित बससेवा उपलब्ध आहे, तसेच खासगी टॅक्सीनेही प्रवास करता येतो. हिरव्यागार जंगलामधून जाणारा रस्ता आणि वाटेत दिसणारे पक्षी व वन्यजीव प्रवासाला वेगळाच आनंद देतात.

राहण्याची व्यवस्था

नागझिरा अभयारण्यातील निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आनंद लुटू इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी विविध निवास पर्याय उपलब्ध आहेत, जे आराम आणि जंगलातील अनुभवाचा परिपूर्ण संगम साधतात. महाराष्ट्र वन विभागाद्वारे व्यवस्थापित वन विश्रामगृहे पर्यटकांना जंगलाच्या मध्यभागी राहण्याची संधी देतात. जिथे शांतता आणि निसर्गाच्या जवळ राहण्याचा आनंद मिळतो. जंगलाच्या सान्निध्यात राहून आधुनिक सुविधा हवी असणाऱ्यांसाठी अभयारण्याच्या जवळ काही खासगी रिसॉर्ट्स आणि इको-लॉजेस उपलब्ध आहेत, जे पर्यावरणपूरक राहणीमानासह उत्कृष्ट आरामदायी अनुभव देतात. हंगामाच्या गर्दीच्या कालावधीत (ऑक्टोबर ते जून) पर्यटकांची मोठी गर्दी असल्याने निवासाची आगाऊ बुकिंग करणे अत्यावश्यक ठरते. योग्य नियोजन केल्यास, नागझिराच्या या निसर्गरम्य वातावरणात तुमची सफर अधिक सुखद आणि संस्मरणीय ठरेल.

जवळची पर्यटनस्थळे

नागझिरा वन्यजीव अभयारण्याच्या परिसरात अनेक निसर्गरम्य स्थळे आहेत, जी पर्यटकांच्या सहलीला अविस्मरणीय बनवतात. नवेगाव राष्ट्रीय उद्यान (५० किमी) हे पक्षीप्रेमींसाठी स्वर्गच आहे. येथे डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य आणि नयनरम्य तलाव असल्याने जैवविविधतेचा मनमोहक अनुभव घेता येतो. साहसप्रेमींना कान्हा (१६० किमी) आणि पेंच राष्ट्रीय उद्यान (१२० किमी) येथे रोमांचक वन्यजीव सफारीचा आनंद घेता येतो. इथे वाघ, हरणे आणि असंख्य वनस्पती व प्राणी पाहायला मिळतात. शांततेच्या शोधात असणाऱ्यांसाठी इतियाडोह धरण (६५ किमी) हा उत्तम पर्याय आहे, जिथे निसर्गाच्या सान्निध्यात विश्रांती घेता येते. तसेच, खेकरानाळा तलाव (१०० किमी) हिरव्यागार जंगलांनी वेढलेला असून, पिकनिक, ट्रेकिंग आणि वॉटर स्पोर्ट्स साठी सर्वोत्तम आहे. ही सर्व स्थळे निसर्गप्रेमी, साहस प्रेमी आणि वन्यजीवप्रेमींसाठी आदर्श असून, नागझिराच्या सफरीला अधिक समृद्ध करतात.

पर्यटकांसाठी महत्वाची माहिती

नागझिरा वन्यजीव अभयारण्याच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेताना सुरक्षितता आणि जबाबदारी या दोन्हींचे भान ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अभयारण्याचा सर्वोत्कृष्ट अनुभव घेण्यासाठी गायडेड सफारी निवडणे हे शहाणपणाचे ठरेल. अनुभवी गाईड्सच्या मदतीने तुम्हाला येथील समृद्ध वन्यजीव, वनस्पती आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळेल. सुरक्षिततेच्या दृष्टीने वन्यजीवांपासून योग्य अंतर राखावे, नियमांचे पालन करावे, मोठ्या आवाजाने त्यांना अस्वस्थ न करता त्यांचे निरिरक्षण करणे आवश्यक आहे. तसेच, पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्लास्टिकचा वापर टाळा, कचरा टाकू नका आणि पुन्हा वापरण्याजोग्या वस्तूंचा अवलंब करा. तुम्ही या नियमांचे पालन केल्यास नागझिराची नैसर्गिक समृद्धी अबाधित राहील आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हे अभयारण्य टिकून राहील.

नागझिराला का भेट द्यावी?

नागझिरा वन्यजीव अभयारण्याला भेट देणे म्हणजे निसर्गाच्या सौंदर्यात रममाण होण्याचा एक अनोखा प्रवास आहे. येथील विस्मयकारक निसर्गरम्यता, अद्भुत वन्यजीव आणि शांततेचा अनुपम अनुभव तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. वन्यजीव प्रेमी असाल, निसर्गाची आवड असेल किंवा साहस शोधत असाल, नागझिराची नितळ सुंदरता तुम्हाला नक्कीच भारावून टाकेल. त्यामुळे तुमची बॅग भरा, या रोमांचक सफरीवर निघा आणि नागझिराच्या जंगलात निसर्गाचा खरा जादुई स्पर्श अनुभवा!

Travel Essentials

Here are the travel essentials one should know

Weather

Ideal Duration

Best Time

Planning a Trip?

http://mahabooking.com/

Top Attractions

Discover the beauty and culture of Maharashtra through our curated experiences

How to Reach

By Air

Nagpur – 126 km

By Train

Sondad – 30 km

By Road

Bhandara – 60 km, Nagpur – 118 km
Scroll to Top